सार्वजनिक वनीकरण योजना
सार्वजनिक वनीकरणाची आवश्यकता
कार्यकारीणीच्या दिनांक १५ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या सभेत कार्यकारीणी सदस्य श्री भरत गणपत राणे यांनी खंत व्यक्त केली होती की आपल्या पिढीने वाडीमध्ये काहीच सुधारणा केलेल्या नसून उलटपक्षी आपल्या वाडवडीलांनी राखून ठेवलेली भू / वन संप्पत्ती नष्ट करत आहोत.
विचार करा की आपण जे आता करत आहोत तीच गोष्ट आपल्या वाडवडीलांनी त्यांच्या पिढीत केली असती आणि पूर्वजांनी कमावलेली भू / वन संप्पत्ती नष्ट केली असती तर आपणांस काय उरले असते ? कदाचित आपल्यापैकी काही जणांस गावही नसते आणि शहरात काही स्वेअर फूटाच्या घरात राहावे लागले असते. प्रत्येक पिढीने आपल्या पुढील पिढीसाठी काय वारसा ठेवत आहोत याचा विचार करावयासच हवा.
आता वयाची पन्नाशी पार केलेल्या प्रत्येक ग्रामस्थाच्या आठवणीत त्यांचे लहानपणी वाडीच्या परिसरात रायवळ आंबा, फणस, चिंच व शेगलाची झाडे होती. काही ग्रामस्थांनी त्यांची मुलेबाळे गावी येऊन झाडाचा उपभोग घेणार नाहीत असा विचार करुन ती विकल्यामुळे किंवा तोडल्यामुळे वाडीमध्ये आता फारशी मोठी झाडे दिसत नाहीत. जंगलातील पायवाटा वहिवाट नसल्यामुळे बंद झाल्यामुळे ‘माडाचे पाणी’ किंवा ‘मदारबाबा’ या ठिकाणी जाणेही होत नाही. करवंदे, चाराबोरे, जांभळे यासारखा रानमेवा गोळा करण्यासाठी रानावनात भटकणे यासारख्या गोष्टी करता येत नसल्यामुळे लहान मुलांना गावी आणल्यावर त्यांच्या मनोरंजनासाठी काय करावयाचे हा विचार प्रत्येक ग्रामस्थाच्या मनात येत असेल. दुदैवाची बाब म्हणजे याच कारणांमुळे तरुण पिढी त्यांच्या स्वत:च्या हक्काच्या गावी जाण्यास नाखुष आहे.
श्री भरत गणपत राणे यांचे विचारानुसार ग्रामस्थांनी एकत्रित येऊन याबाबत याबाबत चर्चा करुन सध्य परिस्थितीची एकमेकांस जाणीव करुन द्यावयास हवी. कदाचित पुढील काळी आपणांसारख्या सामान्य माणसांस मुंबईत राहणे आर्थिक दृष्ट्या कठीण झाल्यास गावी जाण्याचा / राहण्याचा मार्ग उपलब्ध ठेवावयास हवा.
श्री भरत गणपत राणे यांच्या विचाराचा धागा पकडून आणि महत्वाचे म्हणजे आपण पुढील पिढीसाठी काहीतरी करावयास हवे याची जाणीव होऊन संस्था वनीकरण योजना राबविण्याच्या प्रयत्न करणार आहे.
योजनेसंबधी प्राथमिक माहिती
वाडीच्या सभोवतालील परिसरात शक्य होतील त्या ठिकाणी रायवळ-लोणच्याचा-रायत्यासाठी आंबा, कापा-बरका फणस, जांभुळ, चिंच इत्यादि झाडे लावण्याचा विचार असून ती झाडे लावलेली जमीनीची मालकी जमीन मालकाकडेच राहिल. झाडांची देखभाल संस्थेकडून करण्यात येईल आणि त्याबद्दल मोबदला म्हणून जमीन मालकास संस्थेने लागवड केलेल्या झाडापासून मिळणार्या उत्पन्नाचा काही अंशी वापर करावयाची सवलत फळसेवाडीतील सर्व ग्रामस्थांना द्यावी लागेल.
डिसेंबर २०१९ पर्यंत वाडीसभोवतालील परिसरात कमीत कमी अश्याप्रकारची १०० उपयुक्त झाडे लावण्याचा विचार आहे. त्याचबरोबर ग्रामस्थांच्या रानातील जमिनी वनीकरणासाठी उपलब्ध झाल्यास जसे शक्य होईल त्यानुसार त्या त्या ठिकाणींही चाराबोर, बिबा, जांभूळ अश्या प्रकारात मोडणारी कमीत कमी ५०० झाडांच्या लागवडीचा विचार संस्था करत आहे.
ग्रामस्थांकडून उपस्थित होऊ शकणार्या शंका / प्रश्न
- झाडे लागवडीसाठी वापरण्यात येणारी जमीन ग्रामस्थांस संस्थेकडे बक्षिसपत्र करुन द्यावी लागेल का ?
नाही, झाडे लागवडीखाली येणारी जमीन ग्रामस्थाच्या नावावरच राहील परंतू झाडांची लागवड संस्था करणार असल्याकारणे आणि पुढील चार ते पाच वर्षे त्या झाडांचे संगोपण / जतन करणार असल्यामुळे ग्रामस्थास संस्थेबरोबर एक सामंजस्य पत्र करावे लागेल. या सामंजस्य पत्रानुसार या लागवडीमुळे पुढे मिळणार्या उत्पन्नापैकी काही हिस्सा स्वखुषीने पुढील १५ वर्षे विनामोबदला फळसेवाडीतील ग्रामस्थांना किंवा त्याच्या मुलाबाळांना उपभोगावयास द्यावयाचे मान्य करावे लागेल. - संस्थेने लागवड केलेल्या झाडांपासून मिळणारे उत्पन्न ग्रामस्थांस विकता येईल का ?
होय, या झाडांपासून मिळणारे उत्पन्न जमीन मालकांस विकता येईल परंतू त्यामुळे त्यास आर्थिक फायदा होत असल्यामुळे त्यापैकी काही हिस्सा (कमीत कमी २०%) संस्थेस द्यावयास लागेल. तसेच या विक्रीच्या बाबतीत पारदर्शकता राहावी म्हणून संस्थेच्या पदाधिकार्यामार्फतच विक्रीचे व्यवहार करावे लागतील. - संस्थेने लागवड केलेली झाडे तोडता येतील का ?
नाही, ग्रामस्थांच्या पडीक जमीनीत ही लागवड करण्यात येणारअसल्यामुळे ग्रामस्थाने लागवड करण्यात आलेली झाडे कमीतकमी वीस वर्षे न तोडण्याचे बंधन त्याच्यावर राहील आणि अश्याप्रकारच्या अटीचा सामंजस्य पत्रात सामावेश असेल. - संस्थेने लागवड केलेली जमीन ग्रामस्थांस अडीअडचणीच्या वेळी विकता येईल का ?
होय, सामंजस्य पत्रापलिकडे कोणतेही करारपत्र केले जाणार नसल्यामुळे संस्थेने लागवड करुन दिलेली जमीन त्या लागवडीसहीत ग्रामस्थास अडीअडचणीच्या वेळी विकता येईल. अश्याप्रकारे लागवडीसहीत जमीन विक्री करतेवेळी शक्यतो वाडीतील ग्रामस्थास प्राधान्य द्यावयाची अपेक्षा संस्थेकडून बाळगली जाईल. तसेच जमीन विक्री वाडीबाहेरील व्यक्तीस केल्यास संस्थेने लागवडीसाठी केलेल्या खर्चापैकी काही रक्कमेचा परतावा संस्थेस मिळावा अशी अपेक्षा संस्थेकडून बाळगली जाईल. खर्चाचा परतावा मिळावा ही संस्थेची फक्त अपेक्षा असून अश्याप्रकारची कोणतीही अट किंवा बंधने सामंजस्य पत्रात असणार नाही.
संस्थेच्या माध्यमातून वनीकरण ही योजना प्राथमिक स्वरुपात असून याबाबात ग्रामस्थांचे विचार काय आहेत तसेच त्यांच्याकडून या योजनेसंबधी उपस्थित होणार्या शंकाचे / प्रश्नांचे संपूर्ण समाधान होणे गरजेचे आहे. या योजनेबाबत चर्चासत्र घडविण्यात येणार असून, चर्चासत्रात या योजनेस ग्रामस्थांची अनुकुलता लाभल्यास पुढील कार्यक्रमाची आखणी तसेच कागपत्रांची पुर्वतयारी करण्यात येईल. त्यानंतर एखादी विशेष सर्वसाधारण सभा किंवा स्नेहसंम्मेलन भरवून याबाबत पुढील कार्यक्रम ठरविण्यात येईल.
हि योजना आपल्या सर्वांच्या सहभागातूनच पूर्ण होणार असल्यामुळे आणि योजना यशस्वी झाल्यास होणारा लाभ सर्व फळसेवाडी ग्रामस्थांस (मुख्यतो पुढील पिढीस) होणार असल्यामुळे या योजनेबद्दल ग्रामस्थांच्या / युवकांच्या काही शंका असल्यास किंवा खुलासा हवा असल्यास तसेच त्यांस काही सूचना किंवा माहीती द्यावयाची असल्यास त्यांनी कार्यकारीणी सदस्यांशी संर्पक साधावा / पत्रव्यवहार करावा.