फळसेवाडीची सध्याची पाणीपुरवठा व्यवस्था व समस्या फळसेवाडीतील पाणीसमस्या बर्याच वर्षांपासूनची असून ज्ञात माहीतीनुसार ग्रामस्थांची पाण्याची गरज भागविण्यासाठी १९५६ साली सर्वोदय ट्रस्टच्या मदतीमधून ब्राह्मण विहीर बांधलेली आहे.
ब्राम्हणाच्या विहीरीस मुबलक पाणी असले तरी ही विहीर वस्तीपासून थोडी दूर असल्याकारणे तसेच येण्याजाण्यासाठी असलेली वाट चढ-उताराची असल्यामुळे वास्तव्यास असलेल्या बहूतांशी वयस्कर ग्रामस्थांस लांबवर असलेल्या विहीरीवर जाऊन पाणी आणणेही शक्य होत नाही व त्यांस इतरांवर / तरुणांवर अवलंबून राहावे लागते. शहरामध्ये नळयोजनेची सोय असल्यामुळे मुंबईहून गणपतीच्या वेळी किंवा उन्हाळी सुट्टीमध्ये गावी येणार्या चाकरमान्यांस किंवा त्यांच्या कुटुंबियांस विहीरीवर जाऊन रहाटाने पाणी ओढून ते डोक्यावरुन किंवा कमरेवरुन घरापर्यंत वाहून आणने कष्टदायक वाटते. गावी जाऊन मजा करण्याच्या अपेक्षेत असलेल्या तरुणांस दिवसभर पाणी वाहण्याच्या कामात गुंतून पडून राहावे लागल्यामुळे त्याचेपैकी बहुतेक पुढील वेळी गावी न जाणेच पसंद करतात. गावी जाऊन दिवसभर पाणक्याचे काम करण्यापेक्षा मुंबईत राहून नळाव्दारे येणार्या पाण्याचा आनंद घेणे किंवा गावी न जाता गोवा किंवा इतर ठिकाणी फिरावयास जाण्याकडे त्यांचा कल असतो.
या ब्राम्हणाच्या विहीरी व्यतिरिक्त वाडीमध्ये टेंब आणि आवाटाच्या मध्यभागी साटम कुटुंबियांची विहीर आहे. परंतू या विहीरीत नैसर्गिक / कायमस्वरुपी झरे नसल्यामुळे ही विहीर फेब्रुवारी/मार्च महीण्यात काही वर्षी सुकते. वाडीतील ग्रामस्थ इतर स्त्रोत्रापासून पाणीपुरवठा उपलब्ध न झाल्यास या पाण्याचा जपून वापर करतात. परंतू या विहीरीत नैसर्गिक झरे नसल्याकारणे मिळणारा पाणीपुरवठा बेभरवश्याचा आहे.
या व्यतिरिक्त जवळपास वीस वर्षांपूर्वी १९९९ साली शेजारील वरवडे-फळसेवाडी गावात कुपनलिका (बोअरवेल) बांधण्यात आली असता पिसेकामते-फळसेवाडीवर पाणीपुरवठा करण्यासाठी कुपनलिकेशेजारी पाण्याची टाकी बांधण्यात आली. या पाण्याच्या टाकीपासून जवळपास एक ते दिड किलोमीटर डोंगरातून / जंगलातून पाण्याची पाईपलाईन टाकून पिसेकामते-फळसेवाडीवर पाणीपुरवठा करण्याची योजना राबविण्यात आली. परंतू पाणीपुरवठा योजना दुसर्या गावाच्या हद्दीमध्ये आणि या योजनेचे बहुतांशी लाभार्थी पिसेकामते-फळसेवाडीतील ग्रामस्थ असल्यामुळे दुरुस्ती आणि देखभाली साठी पिसेकामते ग्रामपंचायतीकडे ही बाब हस्तांतरीत करण्यात आली. परंतू योजनेअर्तंगत बांधलेली कुपनलिका तसेच पाण्याची टाकी दुर असल्यामुळे तसेच त्याठिकाणी पोहोचण्यासाठी नीट रस्ता नसल्यामुळे फळसेवाडी किंवा पिसेकामते गावातील व्यक्तींस हे व्यवस्थापन त्यांची इतर कामे सांभाळून करणे शक्य होत नाही. तसेच पाणीपुरवठा योजना चालविण्यासाठी देण्यात येणारे मोबदला / वेतन अत्यल्प असल्यामुळे या कामासाठी कायमस्वरुपी नोकर नेमणे शक्य होत नाही. याकारणांमुळे वरवडे-फळसेवाडीतील ग्रामस्थांसच ही योजना चालविण्याची विनंती करण्यात येते. परंतू वरवडे-फळसेवाडीतील ग्रामस्थ या योजनेवर पुर्णतह: अवलंबून नसल्यामुळे त्या वाडीतील लोकांच्या सोईनुसार ही योजना चालविण्यात येते त्यामुळे हा पाणीपुरवठा अनियमीत तसेच बेभरवश्याचा असतो. त्यापूढे हा पाणीपुरवठा करणार्या वाहिण्या जवळजवळ २० वर्षे जुन्या असल्यामुळे पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात त्या फुटण्याचे प्रकार घडतात व त्यावर दुरस्ती व देखभालीसाठी होणारा खर्च ग्रामपंचायतीस पेलवत नसल्यामुळे बर्याचवेळा वेळीच दुरुस्तीच होत नाही. तसेच या कुपनलिकेची साफसफाई होत नसल्यामुळे कुपनलिकेव्दारे उपसा करण्यात येणारे पाणी पुरेसे नसते त्यामुळे पाण्याची टाकी भरण्यास बराच काळ लागतो त्यामुळे विजखर्च इत्यादी बाबींसाठी विनाकारण / विनाफायदा बराच खर्च होतो.
थोडक्यात फळसेवाडी ग्रामस्थांस उपलब्ध असलेले पाणीपुरवठा स्त्रोत किंवा योजना या बेभरवश्याच्या असून दिवसेंदिवस खर्चिक होत आहेत त्यामुळे ग्रामस्थांस स्वत:ची पाणीपुरवठा योजना असणे आवश्यक वाटते.
स्वयंपूर्ण पाणीपुरवठा योजनेची आखणी दिनांक १५ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत स्वयंपूर्ण नळयोजनेव्दारे पाणीपुरवठा योजनेवर चर्चा करण्यात आली असता प्रथमता कुपनलिका खोदून योजना राबविण्याचे ठरविण्यात आले. या योजनेसाठी कार्यकारीणीतर्फे खर्चाचा खालीलप्रमाणे अंदाज दर्शविण्यात आला.
| 1 | झरीवरील १० एकर जमीनीचे सर्वेक्षण करणे (सर्वेक्षण अहवाल) |
35.000 |
|
| 2 | ६ इंच व्यासाची विंधन विहीर / कुपनलीका खोदने |
56,200 |
110,600 |
| विंधन विहीरीवर पंप इत्यादी बसविणे |
54,400 |
||
| 3 | झरीवरील श्री शंकर बाळकृष्ण राणे यांनी सुचविलेल्या त्यांचे जागेवर पाण्याची टाकी बसविण्यासाठी कॉक्रिटचे स्ट्रक्चर उभे करणे |
180,000 |
250,000 |
| बनविलेल्या कॉक्रिटचे स्ट्रक्चरवर ५००० लिटरच्या दोन टाक्या बसविणे |
70,000 |
||
| 4 | पाण्याच्या टाक्यांपासून ग्रामस्थांच्या घरापर्यत पाणीवितरण करण्यासाठी तसेच ब्राम्हणाच्या विहीरीतून पाणी उपसा करून पाण्याच्या टाक्यापर्यत पाणी पोहोचविण्यासाठी पाईपलाईनची व्यवस्था (३००० मीटर पाईपलाईनची आवश्यकता) |
150,000 |
150,000 |
| 5 | ब्राम्हणदेवाच्या विहीरीतून पाणी उचलण्यासाठी लागणारी उपकरणे मुख्यतो कन्ट्रोल, स्टार्टर, फिटींग्स, केबल, पंप आणि मजूरी |
100,000 |
100,000 |
| एकूण अपेक्षित खर्च |
|
645,600 |
|
| ढोबळ अंदाजानुसार तरतूदीची आवश्यकता |
|
700,000 |
- ग्रामस्थां मार्फत निधी उभारणी – ढोबळ अंदाजानुसार टेंब आणि आवाट येथे ३४ घरे असून त्यात ४२ विभक्त कुटूंबे राहतात. फळसेवाडी नळ योजनेसाठी वरील परिच्छेदामध्ये नमुद केल्यानुसार अंदाजे रु.७००,०००/- इतका खर्च ग्रहीत धरून प्रत्येक कुटूंबामागे रु.१६,०००/- इतकी वर्गणी बसविल्यास ग्रामस्थाच्या मार्फतच नळ योजना कार्यन्वित होऊ शकेल.(ग्रामस्थांना सुलभ व्हावे या दृष्टीने वर्गणीची रक्कम त्यांचे सोयीनुसार १२ ते १५ महिण्यात भरण्याची सुविधा देण्याचाही संस्थेने विचार केला असून इतर मार्गानी निधी उभा राहिल्यास ग्रामस्थामार्फत संस्थेकडे जमा होणारी रक्कम त्यांस परत देता येईल किंवा संस्थेच्या सभासदांच्या परवानगीने इतर विधायक व विकास कामांसाठी वापरता येईल).संस्थेच्या जुन्या सभासदांस (६८ सभासद हयात सभासद) मागील ९ वर्षाची मासिक वर्गणी जमा करण्याची विनंती करून त्यांचेमार्फत किती रक्कम जमा होऊ शकते हे पाहावे लागेल. हयात असलेल्या प्रत्येक जुन्या सभासदास जास्तीत जास्त रु.५४०/- हे एकरकमी जमा करावे लागतील. या मार्गाने जवळपास रु.३०,०००/- ते रु.३५,०००/- इतका निधी जमा होणे अपेक्षित आहे.संस्थेमध्ये नवीन नोंदणी करणारया सभासदांस विनंती करून त्यांस सन २०१७ – १८ सालाची मासिक वर्गणी पूर्णपणे जमा करण्याची विनंती करता येईल. पुढील ३ महिण्यात १०० सभासदाच्या नोंदणीचे उध्दिष्ट ठेवल्यास या मार्गाने जवळपास रु.६०,०००/- इतका निधि जमा होणे अपेक्षित आहे.
- देणगी किंवा आमदार फंडामार्फत निधी उभारणी – माननिय आमदार श्री नितेश नारायण राणे साहेब व आदरनीय नेते माननिय आमदार श्री नारायणराव तातू राणे साहेब यांचेकडे वरील योजनेचे माहीती देऊन त्यांचेकडून वैयक्तिक देणगी किंवा आमदार फंडातून काही निधी मिळू शकेल का ? याची विचारणा करावी.तसेच वाडीतील तरुणांच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या हितासाठी कोणा व्यक्ती किंवा संस्था यांचेकडून फळसेवाडी नळ योजनेसाठी देणगी रक्कम मिळू शकेल का याची विचारणा करावी.तसेच वाडीतील ग्रामस्थांना आवाहन करून ग्रामस्थांच्या हितासाठी वैयक्तिक देणगी देण्याची इच्छा असेल त्यांचेकडून देणगी स्वरुपात निधी जमा करावा.
- ग्रामस्थांकडून कर्जाऊ रक्कम –ग्रामस्थाना आवाहन करून त्यांचे कडून फळसेवाडी हितकारी संस्थेस कर्जाऊ रक्कम (बिनव्याजी किंवा ५% वार्षिक व्याजावर) मिळू शकेल का ? हे पाहावे. ग्रामस्थांनी भराणा केलेल्या रक्कमेची परतफेड करण्याची जबाबदारी फळसेवाडी हितकारी संस्था पाहील. या रक्कमेची परतफेड ३ ते ५ वर्षात करता येऊ शकेल.
- बैंकेकडून कर्जाऊ रक्कम – जिल्हा बैक, ग्रामीण बैंक किंवा राष्ट्रीयकृत बैकेकडून फळसेवाडी हितकरी संस्थेस कर्जाऊ रक्कम मिळेल का हे देखील पाहावे. या रक्कमेची परतफेड ग्रामस्थांकडून मासिक देखभाल शुल्क बसवून करता येईल.
वरील योजनेस विशेष सर्वसाधारण सभेत उपस्थितांची मान्यता मिळविण्यात आली.
फळसेवाडी हितकारी संस्थेव्दारे नळयोजनेव्दारे पाणीपुरवठा योजनेसाठी झालेले प्रयत्न
वाडीमध्ये असणारे पाण्याचे स्त्रोत (विहीरी) पुरेसे किंवा बेभरवश्याचे असल्यामुळे वाडीच्या आसपासच्या परिसरात पाणीसाठा उपलब्ध होत का ? हे पाहण्यासाठी नविन तंत्राने पाहणी करणार्या मे. टेरा हायड्रोटेक सोल्युशनस् या फर्मस एप्रिल २०१७ मध्ये पाणी सर्वेक्षणाचे कंत्राट देऊन फळसेवाडी परीसरातील जवळपास १० एकर जमिनीचे सर्वेक्षण करुन घेतले. मे. टेरा हायड्रोटेक सोल्यूशन फर्मकडून मिळालेला अहवाल संस्थेकडे उपलब्ध आहे. या सर्वेक्षणासाठी रु.३५,०००/- इतका खर्च करण्यात आला (सर्वेक्षण अहवाल).
मे. टेरा हायड्रोटेक सोल्यूशन फर्मने त्यांच्या अहवालात नमूद केल्यानुसार फळसेवाडी आसपासच्या परिसर काळ्या एकसंध बसाल्ट खडकाचा बनला असल्यामुळे कुपनलिकेचा व्यास, तिची खोली आणि एकदा उपसा केल्यावर तिच्यातील पाणीसाठा पूर्ववत होण्यासाठी लागणारा कालावधी विचारात घेता फळसेवाडी परिसरात कुपनलिका खोदूण पाणीपुरवठा योजना राबविणे योग्य ठरणार नाही. परंतू कुपनलिके ऐवजी मोठ्या घेराच्या पारंपारिक विहीरीचा विचार झाल्यास दोन ठिकाणी सार्वजनिक पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होऊ शकेल. त्यांनी सुचविलेल्या दोन जागांपैकी चिंचेचा डोब (तांबळ) या ठिकाणांजवळ असलेली एक जागा पारंपारिक विहीर खोदण्यास योग्य आहे असे मत नोंदविले. त्यानंतर संस्थेने स्वयंपूर्ण नळयोजनेमार्फत पाणीपुरवठा करण्यासाठी खालील सुधारीत कार्यक्रम (टप्याटप्यानुसार) हाती घेतला –- टेंबावर पाण्याची टाकी बांधण्यासाठी कॉन्क्रिटचे स्ट्रक्चर बांधणे व त्यावर ५,००० लिटरच्या दोन टाक्यांची व्यवस्था करणे.
- पाण्याच्या टाक्यापासून वाडीवर पाणी वितरीत करण्यासाठी पाईपलाईनची व्यवस्था करणे
- पिसेकामते-वरवडे गावाहून येणारा पाणीपुरवठा वाडीवर वितरीत न करता प्रथम टेंबावरील टाकीत सोडणे व टेंबावरील पाण्याच्या टाक्यांतून पाण्याचे वितरण करणे जेणेकरून ग्रामस्थांच्या सोईच्या वेळेनुसार पाणी सोडता येईल.
- ब्राह्मणाच्या विहीरीपासून पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन टाकून ब्राम्हणाच्या विहीरीचे काही पाणी (५००० लिटरपर्यंत) एका पाण्याच्या टाकीत पोहचविण्याची व्यवस्था करणे
- चिंचेच्या डोब (तांबळ) येथे नवीन २५ फूट व्यासाची विहीर खोदून त्या विहीरीपासून पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन टाकून विहीरीचे पाणी पाण्याच्या टाकीत पोहोचविण्याची व्यवस्था करणे.
- वरवडे-फळसेवाडी गावाच्या पाण्यावरील अवलंबित्व कमी करणे व स्वत:ची पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णतह: कार्यंन्वित करणे
वरील टप्यानुसार पाणीपुरवठा योजना कार्यन्वित करण्यासाठी सुधारीत खर्चाचा खालील प्रमाणे अंदाज करण्यात आला –
|
जुना अंदाज |
सुधारीत अंदाज |
||
| 1 | विंधन विहीरीवर पंप इत्यादी बसविणे |
54,400 |
|
| 2 | पाणीची टाकी / टाक्या ठेवण्यासाठी २० फूट उंचीचे कॉक्रीट स्ट्रक्चर उभे करणे |
180,000 |
190,000 |
| 3 | कॉक्रीट स्ट्रक्चरवर प्रत्येकी ५,००० लिटर पाणी साठविण्याची क्षमता असलेल्या दोन सिन्टेक्सच्या टाक्या बसविणे |
70,000 |
60,000 |
| 4 | पाण्याच्या स्त्रोतापासून पाण्याच्या टाक्यांपर्यत तसेच पाण्याच्या टाक्यांपासून ग्रामस्थांच्या घरापर्यंत पाईपलाईन व्यवस्था उभारणे (अंदाजे ३००० मीटर पाईपलाईन) |
150,000 |
150,000 |
| 5 | पाणी उपसा करण्यासाठी पंप, केबल, कंन्ट्रोल, स्टार्टर, फिटींग्स इत्यादि मजूरी सहीत |
100,000 |
100,000 |
| 6 | डोहाच्या चिंचेजवळ २५ फूट व्यासाची विहीर खोदणे |
450,000 |
|
| एकूण खर्च |
554,400 |
950,000 |
सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे फायदे – वरील योजना पूर्णत्वास गेल्यास फळसेवाडीमध्ये सध्या कायमस्वरुपी वास्तव्यास असलेल्या जवळपास २०० ग्रामस्थास दरडोई ५० लिटर इतक्या पाण्याचा पुरवठा होऊ शकेल. या योजनेची देखभाल फळसेवाडी हितकारी संस्था करेल.
ग्रामस्थांसाठी होणारे इतर फायदे
- वरवडे-फळसेवाडी गावातून सध्या होत असलेला पाणीपुरवठा पुरसे नसल्यामुळे तसेच अनियमीत असल्यामुळे आपली स्वत:ची पाणीपुरवठा व्यवस्था उभी केल्यास पाण्याचे वेळापत्रक सुधारून ग्रामस्थांचा वेळ वाचू शकेल व वाचलेला वेळ सन्मार्गी लावता येईल.
- फळसेवाडी सलग्न मुंबईतील काही ग्रामस्थांनी वैयक्तिक कुपनलिका खोदण्याचा प्रयत्न केला असुन कुपनलिका खोदण्यासाठी होणारा भांडवली खर्च तसेच ती चालविण्यासाठी होणार्या विद्युतवापराचा खर्च तसेच कुपनलिकेच्या दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च विचारात घेता वैयक्तिक कुपनलिका खोदून त्याचा पुरेसा वापर होणार नसेल तर वैयक्तिक कुपनलिका खोदणे योग्य नाही. तसेच एकापेक्षा अधिक कुपनलिका परिसरात खोदून पाण्याचा उपसा केल्यास परिसरातील भुगर्भातील पाणीपुरवठा नष्ट होण्याची शक्यता आहे.
- मे. टेरा हायड्रोटेक सोल्यूशन यांच्या अहवालात दिल्यानुसार फळसेवाडी परीसरात कुपनलिका खोदणे फायद्याचे नसल्यामुळे वैयक्तिक पाणीसमस्या सोडविण्यासाठी रु.५०,०००/- ते रु.६०,०००/- खर्चून वैयक्तिक कुपनलिका खोदण्यापेक्षा सार्वजनिक पारंपारिक विहीर खोदल्यास त्याचा फायदा दिर्घकालीन व संपूर्ण वाडीस होऊ शकेल. परंतू पारंपारिक विहीर खोदण्यासाठी होणारा खर्च एका ग्रामस्थाच्या आवाक्यात नसल्यामुळे याबाबत प्रयत्न होत नाहीत.
- फळसेवाडीवर पाण्याची उपलब्धता व योग्य नियोजन नसल्यामुळे तसेच गावी गेल्यास लांबवर पाणी आणावयास जावे लागत असल्यामुळे तरूण पिढी गावी जाण्यास उत्सुक नसते किंवा गावाबद्दल आस्था दाखवत नाही ही बाब पाणीपुरवठा नियमीत झाल्यावर नाहीशी होईल व तरुण पिढीस गावाची आवड निर्माण होईल तसेच कायमस्वरुपी गावी वास्तव्यास असणार्यांची संख्या वाढू शकेल.
- पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध झाल्यावर स्थानिकांच्या पुढाकाराने त्यांच्या उत्पन्नासाठी फळसेवाडी हितकारी संस्थेच्या माध्यमातून सामाईक शेती / फुलबागा / भाजीपाला इ. प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न करता येतील व ग्रामस्थास उपजिविकेचे एक साधन उपलब्ध करता येऊ शकेल.
वरील योजना मार्च २०१९ पूर्वी पुर्णत्वास नेण्यासाठी संस्था प्रयत्नशील असुन कोणी या योजनेस आर्थिक पाठबळ देऊ इच्छित असल्यास किंवा त्यांच्या वैयक्तिक संर्पकातून फंड उभारणी करू शकत असल्यास त्यांनी फळसेवाडी हितकारी संस्थेचे कार्यकारीणी सदस्य श्री दशरथ दत्ताराम साटम (मोबाईल क्रमांक ९८२०१ १४७२३) यांच्याशी संर्पक करावा जेणेकरून लवकरात लवकर ही योजना मार्गी लावता येऊ शकेल.
स्वयंपूर्ण नळयोजनेव्दारे पाणीपुरवठा योजनेचे पूर्णत्वास गेलेले टप्पे
- २५ मे २०१८ रोजी पाण्याच्या टाकीच्या स्ट्रक्चरचे काम सुरु करण्यात आले
- ०८ जून २०१८ रोजी स्ट्रक्चरचा पाया घालण्यात आला
- २८ जून २०१८ रोजी टाकीच्या स्ट्रक्चरचा स्लॅब ओतून टाकीच्या स्ट्रक्चरचे काम पूर्ण करण्यात आले


- १९ जुलै २०१८ रोजी ग्रामदेवता श्री लिंगेश्वर तसेच श्री ब्राम्हणदेव आणि श्री येडदोबा या देवतांना श्रीफळ ठेवून पाईपलाईनसाठी पहिली चरी मारण्याचे (पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चर ते साटम कुटूंबियांची विहीर) काम सुरु करण्यात आले. २१ जुलै २०१८ पहिल्या चरीचे काम तीन दिवसांत पूर्ण करण्यात आले.
- २२ जुलै २०१८ रोजी दुसरी चरी मारण्याचे (पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चर ते जुन्या पाईपलाईनला नविन पाईपलाईन मिळविण्यासाठी) काम सुरु करण्यात आले.
- २३ जुलै २०१८ रोजी दुसरी चरी मारण्याचे काम पूर्ण करण्यात आले.
- २५ जुलै २०१८ रोजी तिसरी चरी मारण्याचे (पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चर ते ब्राह्मण विहीर) काम सुरू करण्यात आले. परंतू हे अंतर सर्वात जास्त असल्यामुळे तसेच मध्ये मोठ्या झाडांची मुळे आणि पाणथळ जागा असल्यामुळे ही चरी मारण्यासाठी सर्वात जास्त म्हणजे ५ दिवसांचा कालावधी लागला.

- ०२ ऑगष्ट २०१८ रोजी कोल्हापूरवरून पाण्याच्या टाक्या प्रथम कणकवली व तेथून फळसेवाडी (गाडीतळ) येथे पोहोचल्या, ताबडतोब लमाणी व स्थानिकांच्या मदतीने पाण्याच्या टाक्या स्ट्रक्चरपर्यत नेण्यात आल्या. ०५ ऑगष्ट २०१८ रोजी पाईपलाईन टाकणार्या कंत्राटदाराचे कामगार तसेच स्थानिकांच्या मदतीने पाण्याच्या टाक्या क्रेन वगैरेचा वापर न करताच मोठ्या कसरतीने स्ट्रक्चरवर चढविण्यात आल्या.

- ०३ ऑगष्ट २०१८ रोजी श्री ब्राम्हणदेवाच्या मंदिरात श्रीफळ ठेवून पाईप लाईनच्या कामास सुरवात करण्यात आली.
- ०४ ऑगष्ट २०१८ रोजी ब्राह्मण विहीरीत पहिला पंप (किर्लोस्कर २ HP) सोडण्यात आला.
- ०५ ऑगष्ट २०१८ रोजी ब्राह्मण विहीर ते पाण्याची टाकीपर्यंतची पाईप लाईन पूर्ण करण्यात आली.
- ०८ ऑगष्ट २०१८ रोजी साटमांच्या विहिरीत दुसरा पंप (किर्लोस्कर २ HP) सोडण्यात आला.
- ०९ ऑगष्ट २०१८ रोजी टाक्यांपासून पाईपलाईन जुन्या पाईपलाईनला जोडण्यात आली.

- ०९ ऑगष्ट २०१८ रोजी पाईपलाईन सुरु करण्यात (कुठे गळती आहे का हे चेक करण्यासाठी) आली. ब्राह्मण विहीरीच्या पाईपलाईनला थोडी गळती असल्यामुळे, साटमांच्या विहीरीतून पाण्याच्या टाक्या पूर्ण भरण्यात आल्या (दोन्ही टाक्या भरण्यासाठी जवळपास ५५ मिनीटे इतका कालावधी लागला व विजेचे २ युनिट खर्च झाले). टाक्या भरल्यावर वाडीवर पाणी सोडण्यात येऊन ज्या ग्रामस्थांची घरे उघडी आहेत त्याचे नळ उघडून पाण्याचे प्रेशर चेक करण्यात आले.
- अश्या तर्हेने फळसेवाडीवरील स्वयंपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेचा एक टप्पा पूर्ण झालेला असून त्यासाठी आजपर्यंत झालेला खर्च व शिल्लक असलेली कामे याबद्दल माहीती पुढे दिली आहे.
स्वयंपूर्ण नळयोजनेव्दारे पाणीपुरवठा योजने अंर्तगत झालेला खर्च आणि उर्वरित कामे
|
प्रथम अंदाज |
सुधारित अंदाज |
प्रत्यक्षात झालेला खर्च |
||
| 1 | पाणीची टाकी / टाक्या ठेवण्यासाठी २० फूट उंचीचे कॉक्रीट स्ट्रक्चर उभे करणे |
180,000 |
190,000 |
210,000 |
| 2 | कॉक्रीट स्ट्रक्चरवर प्रत्येकी ५,००० लिटर पाणी साठविण्याची क्षमता असलेल्या दोन सिन्टेक्सच्या टाक्या बसविणे |
70,000 |
60,000 |
80,240 |
| 3 | पाण्याच्या स्त्रोतापासून पाण्याच्या टाक्यांपर्यत तसेच पाण्याच्या टाक्यांपासून ग्रामस्थांच्या घरापर्यंत पाईपलाईन व्यवस्था उभारणे |
150,000 |
150,000 |
243,005 |
| 4 | पाणी उपसा करण्यासाठी पंप, केबल, कंन्ट्रोल, स्टार्टर, फिटींग्स इत्यादि मजूरी सहीत |
154,400 |
100,000 |
|
| एकूण खर्च |
554,400 |
500,000 |
533,245 |
|
| 5 | डोहाच्या चिंचेजवळ २५ फूट व्यासाची विहीर खोदणे |
- - |
450,000 |
- - |
| एकूण खर्च |
- - |
450,000 |
- - |
|
| एकूण खर्च |
554,400 |
950,000 |
533,245 |
पाणीपुरवठा योजनेअंर्तगत शिल्लक राहिलेली कामे –
- पाण्याच्या दोन स्त्रोतापासून (ब्राम्हणविहीर आणि साटमांची विहीर) पाण्याच्या टाक्यापर्यंत पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आलेली असून, पैलाडहून येणारे पाणी पाण्याच्या टाकीपर्यंत पोहचविण्यासाठी पाईपलाईनची व्यवस्था करावयाची आहे. तसेच डोहाच्या चिंचेजवळ विहीरीचे काम झाल्यानंतर ती विहीर ते पैलाडहून येणारी पाईपलाईन यास जोडणारी पाईपलाईनची व्यवस्था करावयाची आहे.
- तसेच पाण्याच्या टाकीपासून ग्रामस्थांच्या घरापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी दुसर्या एका पाईपलाईनची व्यवस्था करावयाची आहे.
- डोहाची चिंच येथे बांधण्यात येणार्या विहीरीवर पाणी उपसा करण्यासाठी पंप, केबल, कंन्ट्रोल, स्टार्टर, फिटिंग्स इत्यांदींची व्यवस्था करावयाची आहे.
- पाण्याच्या टाकीपर्यंत थ्री फेज विजपुरवठा आणण्याचा विचार असून येथून तिन्ही ठिकाणचे (ब्राम्हणविहीर, डोहाच्या चिंचेजवळील विहीर आणि साटमांची विहीर) पंप चालू करता येतील.
- पाण्याच्या टाकीच्या खाली मीटर रुम बांधावयाचा विचार आहे.