फळसेवाडी संबधी
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली तालूक्यात पिसेकामते गावात एकूण सात वाड्यापैकी (कदमवाडी, ब्राम्हणवाडी, गावठंणवाडी, बौध्दवाडी, भोगलेवाडी, मधलीवाडी आणि फळसेवाडी) फळसेवाडी ही वाडी कणकवली – आचरा रोडवर (राज्य मार्ग क्रमांक १८१) कणकवली तालुक्यातील राज्य परिवहन बस स्थानकापासून सात किलोमीटर अंतरावर आहे. आचरा रोडवरून फळसेवाडीवर जाण्यासाठी फळसेवाडी शाळा याठिकाणी एक फाटा असून कच्च्या / पक्क्या रस्त्यावरून एक ते दिड किलोमीटर अंतर आत गेल्यावर टेंब व आवाट याठिकाणी ग्रामस्थांची घरे आहेत.
फळसेवाडीमधील ग्रामस्थांनी स्थापन केलेली “फळसेवाडी हितकारी संस्था” ही संस्था धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आलेली संस्था असून (नोंदणी क्रमांक – महाराष्ट्र शासन / एफ / १७१२९ / मुंबई / ९२) ग्रामस्थांच्या हितासाठी कार्यरत आहे. फळसेवाडीशी साडेचारशेहुन अधिक ग्रामस्थ संलग्न असून जवळपास ४०० ग्रामस्थ मुंबईत कामाधंद्यानिमित्त वास्तव्यास आहेत व त्यापैकी १७५ हून अधिक ग्रामस्थ (१८ वर्षावरील मुंबईस्थित) फळसेवाडी हितकारी संस्थेचे सभासद आहेत. फळसेवाडीत मुख्यत: टेंब व आवाट याठिकाणी ५० हून अधिक ग्रामस्थ कायम वास्तव्यास आहेत (घरांसंबधी माहिती तक्ता क्रमांक १ मध्ये दिली आहे).
पावसावर अवलंबून असलेल्या भातशेतीव्यतिरिक्त इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन उपलब्ध नसल्यामुळे वाडीतील बहूतांशी ग्रामस्थ उपजीविकेसाठी बाहेरगावी (मुंबई व इतर ठिकाणी) वास्तव्यास आहेत परंतू ग्रामस्थांस आपल्या गावाविषयी आपुलकी असल्यामुळे वर्षातून किमान दोनवेळा तरी ते आपल्या मुळ गावी भेट देतात. ऑगष्ट / सप्टेंबर महिण्यामध्ये येणारा गणपतीउत्सव तसेच एप्रिल / मे महिण्यातील मुलांना मिळणारी उन्हाळी सुट्टी याकाळात वाडीवर जवळपास २०० हुन अधिक ग्रामस्थ वास्तव्यास असतात.