कै श्री सखाराम आबाजी रावराणे
जन्म : १ जानेवारी १९०१ मृत्यू : ४ ऑगष्ट १९७१
सखाराम आबाजी रावराणे ही नऊ अक्षरे फळसेवाडीयांसाठी जणू मंतरलेली. इंग्रजी दुसरीपर्यंत शिक्षण घेतल्यावर त्यांनी मुंबईच्या कॉरनर्स कोर्टात नोकरी करत असतांना स्वत:च्या व्यक्तीमत्वाची वेगळीच छाप पाडली. या कोर्टात प्रत्येक समाजातील / स्तरातील लोकांना भेटावे लागत असल्यामुळे अण्णांचा जनसंर्पक वाढत गेला. त्यावेळी जेव्हा केव्हा कोणी त्यांस तूमच्या माहितीतील कोणी शिकलेले असल्यास त्या उच्चपदी नोकरीला लावतो अशी विचारणा केल्यास नोकरीची संधी उपलब्ध असतांनाही अण्णा निरुत्तर व्हायचे. त्यामुळे अण्णांनी सर्वप्रथम शिक्षणाचे महत्व आणि काळाची पाऊले ओळखली. परंतू फळसेवाडीतील ग्रामस्थांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी जवळपास शाळाच नव्हती, ज्या शाळा होत्या त्या तीन-चार किलोमीटर अंतरावर असल्यामुळे आणि त्याकाळी वाहतूकीची साधणे नसल्यामुळे लहान मुलांस प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी लांबवर असलेल्या शाळेत शिकावयास पाठविणे ग्रामंस्थांस शक्य होत नव्हते.
आपल्या फळसेवाडीत शाळा असावी असा विचार अण्णांच्या मनात घोळू लागल्यावर त्यांनी आपला विचार वाडीतील इतरांसमोर मांडला. तेव्हा बाळकृष्ण आबाजी रावराणे, श्रीधर यशवंत रावराणे, नाना गोविंद राणे, भगवान बाबू सावंत, संभाजी गोपाळ राणे, राजाराम नाना राणे या सर्वांनी या कल्पनेला मूर्त स्वरुप देण्याचे ठरविले. शाळा सुरू करण्यासाठी मुख्य अडचण होती ती जागेची. अण्णांच्या मांगरात प्रथम शाळा सुरू करण्याचे ठरविले. विनायक साटम यांनी या शाळेचा प्रथम शिक्षक होण्याचा मान मिळविला.
